काजू लागवड

पाण्याचा निचरा होणाऱ्या सर्व जमिनींत, जांभा दगडापासून तयार झालेल्या वरकस जमिनीत काजूचे पीक चांगले येते. लागवडीसाठी वेंगुर्ला- 1, वेंगुर्ला- 4, वेंगुर्ला- 6, वेंगुर्ला- 7, वेंगुर्ला- 8 या जातींची कलमे निवडावीत. लागवड करण्यासाठी एप्रिल-मे महिन्यांत 7 मीटर बाय 7 मीटर किंवा 8 मीटर बाय 8 मीटर अंतर ठेवून 60 बाय 60 बाय 60 सें. मी. आकाराचे खड्डे खणावेत. खड्ड्यात दोन घमेली शेणखत, एक किलो सिंगल सुपर फॉस्फेट मातीत मिसळून या मिश्रणाने खड्डे भरून घ्यावेत. कलमांची लागवड पाऊस स्थिरावल्यानंतर करावी. कलमे लावताना कलमांची हंडी फुटणार नाही, याची काळजी घ्यावी. कलमाला काठीचा आधार द्यावा. कलमाच्या खुंटावर येणारी फूट वेळोवेळी काढून टाकावी. कलमांच्या जोडावरील प्लॅस्टिकची पिशवी काढून टाकावी. आळ्यात गवताचे आच्छादन करावे. उन्हाळ्यात गरजेनुसार कलमांना पाणी द्यावे.