नारळ लागवडीबाबत माहिती..

 

नारळ लागवड

  1. जातींची माहिती
    1. उंच जाती
    2. ठेंगू जाती
    3. संकरित जाती

नारळ लागवड

नारळ लागवडीसाठी एक वर्ष वयाची रोपे निवडावीत. रोपांचा बुंधा आखूड व जाड असावा. एक वर्ष वयाच्या रोपांना पाच ते सहा पाने असावीत. रोपे निरोगी व जोमदार असावीत. रोपे खात्रीशीर रोपवाटिकेतून खरेदी करावीत. दोन झाडांमधील अंतर योग्य असणे गरजेचे आहे आणि ते जर नसेल तर नारळ उशिरा लागणे किंवा न लागणे, यांसारख्या समस्या दिसतात. पानाचा देठ ते शेंड्यापर्यंत सरळ अंतर 3.25 ते 3.5 मीटर असते. म्हणून दोन माडांत 7.5 मीटर अंतर असेल तर नारळाच्या झावळ्या एकमेकांत शिरणार नाहीत किंवा एकमेकांना झाकणार नाहीत.

माडापासून योग्य प्रमाणात उत्पन्न मिळण्यासाठी नवीन सलग लागवड करताना दोन ओळींत आणि दोन रोपांत 7.5 मीटर अंतर ठेवावे. पाटाच्या, शेताच्या किंवा कुंपणाच्या कडेने एका ओळीत नारळाची लागवड करावयाची असल्यास 6.75 किंवा सात मीटर अंतर ठेवले तरी चालेल. ठेंगू जातीसाठी सहा मीटर अंतर चालू शकते.

जातींची माहिती

नारळांच्या जाती खाली दिल्या आहेत.

उंच जाती

  1. वेस्ट कोस्ट टॉल (बाणवली) - पूर्ण वाढलेल्या प्रत्येक झाडापासून सरासरी 80 ते 100 फळे मिळतात.
  2. लक्षद्वीप ऑर्डिनरी (चंद्रकल्पा) - पूर्ण वाढलेल्या झाडापासून सरासरी 150 फळे मिळतात.
  3. प्रताप - नारळाचा आकार मध्यम, गोल असून, झाड सहा ते सात वर्षांत फुलोऱ्यात येते. या जातीच्या एका झाडापासून 150 नारळ मिळतात.
  4. फिलिपिन्स ऑर्डिनरी - नारळ आकाराने फारच मोठे असतात. नारळाचे उत्पादन सरासरी 105 नारळ आहे.

ठेंगू जाती

रंगावरून ऑरेंज डार्फ, ग्रीन डार्फ आणि यलो डार्फ अशा पोटजाती आहेत. ऑरेंज डार्फ ही जात शहाळ्यासाठी सर्वांत उत्तम आहे.

संकरित जाती

  1. टीडी (केरासंकरा) - या जातीची झाडे चार ते पाच वर्षांत फुलोऱ्यात येतात. एका झाडापासून सरासरी 150 नारळ फळे मिळतात. खोबऱ्यात तेलाचे प्रमाण 68 टक्के इतके असते.
  2. टीडी (चंद्रसंकरा) - फळधारणा चार ते पाच वर्षांनी होते. या जातीचे उत्पादन प्रतिवर्षी 55 ते 158 फळे असते, तर सरासरी उत्पादन 116 फळे आहे.